नवी दिल्ली : जगातील सर्वात गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचाही समावेश आहे. भारताची अर्थव्यवस्था पुढील ३० वर्षात ३० हजार अब्ज डॉलरची बनेल, अशी अपेक्षा आहे. आणि भारतीय रुपयामध्ये ती २३४० लाख कोटी रुपयांची असेल. केंद्रीय उद्योगमंत्री पियूष गोयल यांच्या मते, भारत पुढील तीस वर्षात ३० हजार अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा देश बनेल. गोयल म्ह्णाले की, भारत दरवर्षी ८ टक्क्यांची वाढीची गती राखून आहे. त्यामुळे पुढील नऊ वर्षात ही अर्थव्यवस्था दुप्पटीने वाढेल. देशाची अर्थव्यवस्था आता ३.२ अब्ज डॉलरच्या आसपास आहे. आणि पुढील नऊ वर्षात ही ६.५ अब्ज डॉलरच्याही पुढे जाईल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.
टीव्ही९हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले की, त्यापुढील नऊ वर्षानंतर म्हणजे आजपासून १८ वर्षानंतर भारतीय अर्थव्यवस्था १३,०००० अब्ज डॉलरची असेल. त्यानंतरच्या नऊ वर्षांमध्ये म्हणजेच आजपासून २७ वर्षांनी ती २६,००० अब्ज डॉलरवर पोहोचू शकेल. अशाच पद्धतीने आम्हाला विश्वास वाटतो की आजपासून तीस वर्षानंतर भारतीय अर्थव्यवस्था ३० हजार अब्ज डॉलरची असेल. उद्योगमंत्री म्हणाले की, आजच्या आव्हानात्मक स्थितीतही अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग चांगला आहे. रशिया आणि युक्रेन यांदरम्यानच्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत काही वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जागतिक महागाईचा दर उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. मात्र, भारताने आपल्याकडे महागाईचा दर कमी राखला आहे. तिरुपूर कापड उद्योगाचे जागतिक केंद्र बनले आहे असे ते म्हणाले.












