मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान आणि पीओजेकेमध्ये दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले केले. दोन्ही देशांत तणावाची स्थिती असतानाही भारतीय शेअर बाजार सकारात्मक स्थितीत बंद झाला. शेअर बाजारांमध्ये सुरुवातीच्या काळात काही अस्थिरता दिसून आली, मात्र उत्तरार्धात निर्देशांक स्थिर राहिले.बाजार बंद होताना बीएसई सेन्सेक्स १०५.७१ अंकांनी (०.१३ टक्के) वाढून ८०,७४६.७८ वर बंद झाला. निफ्टी ५० ३४.८० अंकांनी (०.१४ टक्के) वाढून २४,४१४.४० वर बंद झाला.
बाजार तज्ञांच्या मते, भू-राजकीय तणाव असूनही बाजारातील सकारात्मक भावनांना तीन घटकांनी हातभार लावला. भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार, सतत परकीय गुंतवणूक आणि भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढण्याची चिन्हे नसल्याने बाजार सकारात्मक स्थितीत आला. ऑटो, कंझ्युमर ड्युरेबल्स, धातू, रिअल्टी आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये मजबुती दिसून आली, तर कंझ्युमर गुड्स, फार्मा आणि हेल्थकेअर इंडेक्समध्ये काहीशी घसरण पाहायला मिळाली.