मुंबई : महाराष्ट्र, कर्नाटक यासारख्या देशातील प्रमुख ऊस उत्पादक प्रदेशांमध्ये पावसाने दडी मारल्याने आगामी हंगामात ऊस आणि साखर उत्पादनाबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या दरात पंधरवड्यात 3% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. यामुळे महागाईबरोबरच आगामी काळात साखर निर्यातीला लगाम बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी साखरेचे दर 37,760 रुपये प्रति मेट्रिक टन ($454.80) पर्यंत वाढले, जो ऑक्टोबर 2017 नंतरचे सर्वोच्च दर आहे. जागतिक व्हाईट शुगर बेंचमार्कच्या तुलनेत भारतीय किंमत सुमारे 38% कमी आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना बॉम्बे शुगर मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले की, दुष्काळामुळे नवीन हंगामात उत्पादनात मोठी घट होण्याची भीती साखर कारखानदारांना वाटत आहे. त्यामुळे ते सध्या कमी किमतीत साखर विकण्यास तयार नाहीत. तथापि, जास्त किमतींमुळे साखर कारखानदारांची आर्थिक चणचण दूर होईल आणि शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यास मदत होईल. कमी पावसामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊस उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणाऱ्या नवीन हंगामात साखरेचे उत्पादन 3.3% कमी होऊन 31.7 दशलक्ष मेट्रिक टन होऊ शकते.
जैन म्हणाले की, दरवाढीमुळे भारत सरकारकडून नवीन हंगामात साखर निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. सरकार ने चालू हंगामात 30 सप्टेंबरपर्यंत केवळ 6.1 दशलक्ष मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली आहे., त्या तुलनेत त्यांना गेल्या हंगामात 11.1 दशलक्ष मेट्रिक टन साखरेची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली होती. तीन सरकारी सूत्रांनी गेल्या महिन्यात ‘रॉयटर्स’ला सांगितले की, भारत सरकार आगामी हंगामात साखर निर्यातीला पर्वांद्गी देण्याची शक्यता नाही. त्यामुळे सात वर्षांत प्रथमच निर्यात ठप्प होणार आहे. साखर साठा कमी आणि सणासुदीचा हंगाम जवळ येत्या काही महिन्यांत साखरेच्या किमती आणखी वाढू शकतात, असे मुंबईतील एका व्यापाऱ्याने सांगितले.















