नवी दिल्ली : इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) च्या म्हणण्यानुसार, यंदाच्या २०२४-२५ या हंगामात साखरेचा वापर मागील हंगामापेक्षा कमी असेल. एका अहवालात ‘इस्मा’ने म्हटले आहे की, खपाबाबत हे लक्षात घेतले पाहिजे की, यावर्षाच्या पहिल्या चार महिन्यांसाठी देशांतर्गत विक्रीचा कोटा गेल्या वर्षीच्या समान कालावधीपेक्षा सुमारे ७ लाख टन कमी आहे. याव्यतिरिक्त, गेल्या वर्षभरात, सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान (एप्रिल-जून २०२४) वाढलेल्या मागणीमुळे अधिक विक्री कोटा जारी करण्यात आला. परिणामी, ‘इस्मा’ने उर्वरित आठ महिन्यांत सरासरी २३.५ लाख टन घरगुती वापरासह, २०२४-२५ च्या साखर हंगामासाठी एकूण देशांतर्गत वापर सुमारे २८० लाख टन इतका कमी राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.
देशात गाळप सामान्य गतीने होत असताना, चालू २०२४-२५ या साखर हंगामात ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत साखरेचे उत्पादन ९५.४० लाख टनांवर पोहोचले, जे मागील वर्षी समान कालावधीत ११३.०१ लाख टन होते. इस्माच्या म्हणण्यानुसार, यावर्षी चालू असलेल्या कारखान्यांची संख्या ४९३ आहे. गेल्यावर्षी ५१२ कारखाने कार्यरत होके. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रमुख राज्यांमधील गाळप दर गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगला असल्याचे म्हटले जाते. तथापि, पावसामुळे उसाच्या पुरवठ्यात तात्पुरता व्यत्यय आल्याने डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील गाळपावर परिणाम झाला.
‘इस्मा’च्या मते, निव्वळ साखर उत्पादनातील फरक यावर्षी इथेनॉलसाठी साखरेच्या जास्त वापरामुळे (आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये २१.५ लाख टनांच्या तुलनेत ४० लाख टन अंदाजित) आणि महाराष्ट्र, कर्नाटकमधील साखर कारखाने उशिरा सुरू झाल्यामुळे असू शकतो. ‘इस्मा’ जानेवारी २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यात उपग्रह प्रतिमा प्राप्त करेल. त्याचे तपशीलवार विश्लेषण आणि क्षेत्र भेटीनंतर जानेवारी २०२५ च्या उत्तरार्धात साखर उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर करेल.


















