देशातील अतिरिक्त इथेनॉल उत्पादन क्षमतेचा हवाला देत ‘इस्मा’कडून सरकारकडे निर्यातीची मागणी

नवी दिल्ली : भारतात 450 कोटी लिटर अतिरिक्त इथेनॉल उत्पादनाची क्षमता आहे. ती वापरात नसल्यामुळे इथेनॉल उद्योगाच्या विस्तार योजनांमध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अतिरिक्त इथेनॉल निर्यातीला परवानगी देण्याची विनंती इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (इस्मा) ने गुरुवारी सरकारकडे केली.

याबाबत ‘इस्मा’चे महासंचालक दीपक बल्लानी यांनी पत्रकारांना सांगितले की, देशात अतिरिक्त इथेनॉल उत्पादन क्षमता आधीच तयार केली गेली आहे. ती वापरली जात नाहीये. भारताकडे दरवर्षी 1900 कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याची स्थापित क्षमता आहे. यापैकी 900 कोटी लिटर उसापासून उत्पादित केले जाते तर 1000 कोटी लिटर इथेनॉल धान्य (तांदूळ, मका) वापरून केले जाते.

बल्लानी यांच्या मते 31 ऑक्टोबर रोजी संपलेल्या इथेनॉल पुरवठा वर्षात 2024-25 मध्ये, तेल विपणन कंपन्यांनी 1,048 कोटी लिटर इथेनॉल खरेदी करण्यासाठी करार केले. इतर वापरासाठी आणखी 330 कोटी लिटर पुरवठा करण्यात आला. सरकारने अतिरिक्त इथेनॉलच्या निर्यातीला परवानगी द्यावी. त्यांनी पेट्रोलमध्ये जास्त इथेनॉल मिश्रण करण्याचे आवाहन केले. अधिकृत आकडेवारीनुसार, भारताने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण साध्य केले आहे. उद्योगांची लॉबी हे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी करत आहे.

इथेनॉल मिश्रणामुळे अंदाजे 1.55 लाख कोटी रुपये परकीय चलन वाचण्यास मदत झाली आहे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न 1.36 लाख कोटींनी वाढले आहे, असा दावा बल्लानी यांनी केला. यातून CO2 उत्सर्जन 79 दशलक्ष मेट्रिक टनांनी कमी झाले. ते रस्त्यांवरून 17.5 दशलक्ष वाहने काढून टाकण्याइतके आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here