पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज साहेबराव जाचक यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी कैलास रामचंद्र गावडे यांची निवड करण्यात आली. दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या.
श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक झाली असून, या निवडणुकीमध्ये श्री जय भवानीमाता पॅनेलच्या सर्व उमेदवारांना कारखान्याच्या सभासदांनी उच्चांकी मतांनी निवडून दिले. या निवडणुकीनंतर आता कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. या निवडणुकीमध्ये प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, कामगारनेते युवराज रणवरे, डॉ. राकेश मेहता, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्षपदी कैलास गावडे यांची निवड करण्यात आली.
संचालक अमोल भोईटे, सिद्धार्थ जाचक, अण्णा पाटील, सतीश काटे, नवनिर्वाचित संचालक शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपत कदम, विठ्ठल शिंगाडे, प्रशांत दराडे, अजित नरुटे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, सतीश देवकाते, नीलेश टिळेकर, अशोक पाटील, मंथन कांबळे, माधुरी राजपुरे, सुचिता सपकाळ, तानाजी शिंदे, योगेश पाटील हे उपस्थित होते.
२२ वर्षांनंतर पृथ्वीराज जाचक यांची अध्यक्षपदी वर्णी…
२२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पृथ्वीराज जाचक यांची कारखान्याच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. निवडीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी पवार यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक पार पडली. निवडीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी केला. सत्काराला उत्तर देताना पृथ्वीराज जाचक म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व सर्व सभासदांचा मी आभारी आहे. फार मोठे यश सभासदांनी दिले आहे. या यशाचे योग्य ते चीज करायचे आहे-दिलेला शब्द पाळायचा आहे. सर्व संचालकांच्या वतीने मी शब्द देतो की, कारखान्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करायचे आहे.
वडिलांच्या मारुती ८०० मधून आले जाचक…
पृथ्वीराज जाचक यांच्याकडे अनेक मोठ्या किमतीच्या चारचाकी गाड्या असताना कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष दिवंगत साहेबराव जाचक यांच्या ‘मारुती ८००’ या चारचाकी गाडीतून पृथ्वीराज जाचक अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आले होते. गाडीतून उतरून कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीजवळ आल्यानंतर त्यांनी इमारतीच्या पायरीचे दर्शन घेतले व प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेश केला.