इस्लामाबाद : आधीच महागाईचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये साखरेच्या किमती नवीन उंचीवर पोहोचल्या आहेत. पाकिस्तामधील नागरिकांचे साखरेच्या किमती वाढल्याने जगणे अक्षरशः कठीण झाले आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा सरकारविरुद्ध रोष वाढत आहे. पाकिस्तानच्या काही भागात साखरेच्या किमती प्रति किलोग्रॅम (पीकेआर) १८५ रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत.
फेडरल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात साखरेचा राष्ट्रीय सरासरी दर प्रति किलो ३.३८ रुपयांनी वाढला आहे. गेल्या आठवड्यातील १७१.८१ रुपयांवरून आता हा दर १७५.१९ रुपये प्रति किलो झाला आहे. पेशावरला सर्वात जास्त फटका बसला आहे. तेथील रहिवाशांना प्रति किलो १८५ रुपये इतका सर्वाधिक भाव द्यावा लागत आहे. फक्त एका आठवड्यात, शहरातील साखरेच्या किमतीत प्रति किलो ५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईने आधीच त्रस्त असलेल्या कुटुंबांवर आर्थिक भार वाढला आहे.
वार्षिक आधारावर, वाढ आणखी लक्षणीय आहे. मे २०२४ मध्ये, साखरेचा सरासरी भाव प्रति किलो १४३.७५ रुपये होता. आता मागील वर्षाच्या तुलनेत ३१ रुपयांपेक्षा जास्त वाढ दिसते. साखरेच्या किमतीत झालेल्या या तीव्र वाढीमुळे ग्राहक आणि बाजार विश्लेषक दोघांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. मूलभूत वस्तूंमध्ये सतत वाढणारी महागाई कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते अशी भीती अनेकांना आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्थिक तज्ज्ञ सरकारला वाढत्या किमतींमागील कारणांची चौकशी करण्याची आणि बाजार स्थिर करण्यासाठी त्वरित उपाययोजना राबवण्याची विनंती करत आहेत.


















