कोल्हापूर : कागल तालुक्यात साखर कारखान्यांच्या संख्येबरोबरच त्यांची गाळप क्षमताही वाढली असून, उसाचे क्षेत्र मात्र वाढलेले नाही. त्यामुळे उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान पोहोचवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी खासदार संजय मंडलिक यांनी केले. हमीदवाडा येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण ते बोलत होते.
अध्यक्ष संजय मंडलिक म्हणाले, प्रत्येक शेतकऱ्याने ठिबक सिंचन केले, तरच नव्या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना एकरी १५० टन उत्पादन घेणे शक्य होणार आहे. यासाठी तालुक्यातील पाचही साखर कारखाने एकत्रितपणे एआय तंत्रज्ञान राबवणार आहेत. येत्या हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्याला घालून सहकार्य करावे, असे आवाहनही प्रा. मंडलिक यांनी केले.
अहवाल वाचन कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी केले. यावेळी जयसिंग भोसले, ए. बी. पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला. तसेच जयसिंग भोसले, ए. बी. पाटील, एस. व्ही. चौगले, बाळासाहेब पाटील, निवास पाटील, राणाप्रतापसिंह सासने, दयानंद पाटील, रामचंद्र माळी यांनी आयत्या वेळच्या विषयात विविध ठराव मांडले. यावेळी उपाध्यक्ष आनंदराव फराकटे, आर. डी. पाटील, संचालक शिवाजीराव इंगळे, प्रकाशराव पाटील, प्रा. संभाजीराव मोरे, सत्यजित पाटील, नारायण मुसळे, सुहास खराडे, नामदेवराव मंडके यांच्यासह आजी-माजी संचालक उपस्थित होते. सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली. स्वागत व प्रास्ताविक ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश चौगले यांनी केले.