जालना : कर्मयोगी टोपे समर्थ कारखान्याच्या पुढाकाराने सोनक पिंपळगावमध्ये उभारले एआय हवामान केंद्र

अंकुशनगर : अंबड तालुक्यात आधुनिक ऊस शेतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना आणि केव्हीके बारामती, व्हीएसआय पुणे आणि फसल प्रा. लि. बेंगळुरू यांच्या संयुक्त विद्यमाने आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकारातून सोनक पिंपळगाव येथे ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित पहिले हवामान केंद्र (वेदर स्टेशन) उभारण्यात आले आहे. शेतकरी रामेश्वर पवार यांच्या शेतात २६ शेतकऱ्यांच्या गटाच्या सहभागातून हे एआय हवामान केंद्र स्थापित करण्यात आले आहे. या केंद्राचा लाभ सोनक पिंपळगाव, बारसवाडा तसेच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना होणार असून याचा कार्यक्षेत्राचा परीघ सुमारे पाच किलोमीटर आहे.

या एआय हवामान केंद्राच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता यांसारखी हवामानविषयक माहिती मिळते. यासाठी शेतजमिनीत अत्याधुनिक सेन्सर बसविण्यात आले आहेत. संभाव्य रोग व किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यास शेतकऱ्यांना मराठी भाषेत मोबाइलवर संदेश पाठविले जातात. ऊस उत्पादकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान थेट शेतापर्यंत उपलब्ध करून देण्याच्या ध्येयातून हा प्रकल्प साकार झाला आहे. यावेळी फसल कंपनीचे तंत्रज्ञ माळी, समर्थ कारखान्याचे ऊस विकास अधिकारी यू. एस. मोहिते, कृषी मदतनीस यू. ए. चव्हाण, के.एस. शेरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here