जालना : माजी मंत्री राजेश टोपे यांच्या ताब्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना व सागर कारखान्याच्या सभासदांकडून घेतलेल्या ठेवी बेकायदेशीर आहेत. त्यासह कारखान्याची चौकशी करून कारखान्यावर प्रशासक नेमण्याची मागणी आमदार डॉ. हिकमत उढाण यांनी विधानसभेत केली आहे. यानंतर माजी मंत्री राजेश टोपे व आमदार डॉ. हिकमत उढाण यांच्या समर्थकांत सोशल मीडियावरून आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत.
राजेश टोपे यांनी गेली २५ वर्षे घनसावंगीचे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण यांनी अल्पशा मतांनी पराभव केला. त्यानंतर दोघांतील टीका तीव्र होऊ लागली आहे. समर्थ सहकारी साखर कारखान्यासंदर्भात सभासदांकडून ऊस देयकातून कपात करण्यात येत असलेल्या ठेवीसंबंधी आमदार हिकमत उढाण यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली. आता या दोघांच्या समर्थकांत सोशल मीडियावरून शाब्दिक वॉर, एकमेकांची उणीदुणी काढण्यात येत आहे. अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे मतदारसंघातील राजकारण तापल्याचे चित्र आहे.

















