जालना : जालना जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या युवा शेतकरी संघर्ष समितीने सात दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, दर जाहीर न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही समितीने निवेदनात दिला. रामगव्हाण, गुरुपिंपरी, कुं. पिंपळगाव, गोंदी, तीर्थपुरी, महाकाळा, कोठी, मुद्रेगाव, शिंदेवडगाव, पिंपरखेड, एकलहेरा, लिंबोणी, पानेवाडी, म. चिंचोली, खडका व शिंदखेड या १६ गावांमध्ये झालेल्या बैठकांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घनसांवगी तालुक्यातील वाढता असंतोष लक्षात घेता ही मोहीम पुढील काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
बैठकीत ३,५५० रुपये प्रतिटन एफआरपी देण्यात यावी, केंद्राने निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी दर मान्य नसल्याचे स्पष्ट करत शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांचा विचार करून पहिली उचल ३,२०० रुपये तत्काळ द्यावी, मागील गळीत हंगामातील थकीत एफआरपी त्वरित देण्यात यावी, देयके थकविणाऱ्या कारखान्यांवर नाराजी व्यक्त करत त्वरित पेमेंटची मागणीही करण्यात आली. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता ऊस पेमेंट १४ दिवसांमध्ये अनिवार्य करावे, साखर अॅक्ट १९६६ आणि कंट्रोल ऑर्डरनुसार उशिरा पेमेंट करणाऱ्या कारखान्यांकडून १५ टक्के व्याज आकारावे, तसेच जास्त दर देण्याची क्षमता असलेल्या कारखान्यांना लेखी निवेदन द्यावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. तालुक्यातील १६ गावांमध्ये जनजागृती बैठका घेण्यात आल्या आहेत.

















