जालना : चालू गळीत हंगामासाठी यंदा सुमारे ३९ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. गोदा पट्टा परिसरात उसाची सर्वाधिक लागवड होते. यंदा समर्थ युनिट एक, समर्थ युनिट दोन आणि समृद्धी शुगर्स या तीन साखर कारखान्यांसह इतर जिल्ह्यातील कारखानेही ऊस उचलण्यासाठी दाखल झाले आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखान्यांनी गोदापट्टा परिसरातून ऊस उचलण्यास सुरवात केली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण पाच साखर कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांनी एकूण २१ लाख ६० हजार ३०३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्यातून १६ लाख ४२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ७.४१ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.
अंबड व घनसावंगी तालुक्यांमध्ये कार्यक्षेत्रातील तीन साखर कारखान्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील कारखान्यांनाही ऊस जात आहे. रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा २१.८ टक्के इतका असून, तो सर्वाधिक आहे. त्यानंतर श्रद्धा एनर्जीचा १०.४४ टक्के, समृद्धी शुगर्सचा १०.०४ टक्के, समर्थ युनिट एकचा ९.०४ टक्के, तर समर्थ युनिट दोनचा ९ टक्के साखर उतारा आहे. अंबड तालुक्यातील समर्थ युनिट एक कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्याने ६ लाख ६३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३ लाख ९० हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. घनसावंगी तालुक्यातील समर्थ युनिट दोनने ३ लाख ३ हजार ५३० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ लाख ७९ हजार ६२५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ऊस हंगाम समाप्ती होऊ शकेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

















