जालना : समृद्धी साखर कारखान्याने हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप झालेल्या उसाला एफआरपीपेक्षा ११० रुपये अधिक भाव देत २,८०० रुपये प्रतीटन याप्रमाणे अंतिम बिल दिले. तर गाळप हंगाम २०२३-२४ मध्येदेखील समृद्धी साखर कारखान्यात गाळप झालेल्या उसाला उच्चांकी दर दिला आहे. आता २०२४ – २५ मध्ये गाळप झालेल्या उसाला २९७० रुपये प्रती मेट्रिक टन भाव देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील व व्हाइस चेअरमन महेंद्र मेठी यांनी केली.
चेअरमन सतीश घाटगे-पाटील म्हणाले की, कारखान्याच्यावतीने पहिला हप्ता २५०० रुपये प्रति मेट्रिक टनप्रमाणे दिल्यानंतर लगेच दुसरा हप्ता २०० रुपये प्रती मेट्रिक टन प्रमाणे देण्यात येणार आहे. कारखाना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा आहे. कारखाना सर्वसामान्य शेतकऱ्यांचा म्हणूनच चालविला जातो, याचा आम्हाला अभिमान आहे. कारखान्याने पहिला हप्ता २५०० रुपये प्रति मेट्रिक टनप्रमाणे अदा केला आहे. आता लवकरच २०० रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.


















