जालना : घनसांगवी तालुक्यात ऊस दर आंदोलन तापले, शेतकरी युवा संघर्ष समितीचा पुढाकार

जालना : यंदाचा गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपासाठी आलेल्या उसाला केंद्र शासन व साखर आयुक्तालयाने ठरवून दिलेला ३,५५० रुपये प्रतिटन याप्रमाणे दर द्यावा. गाळपास आलेल्या उसाचा पहिला हप्ता ३,२०० रुपये ऊस तोडणीपासून १४ व्या दिवसाच्या आत देण्यात यावा. मागील गाळप हंगामातील, २०२४-२५ मधील एफआरपीची बाकी रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी अशी मागणी करत युवा शेतकरी संघर्ष समितीने घनसांगवी तालुक्यात ऊस दरासाठी लढा पुकारला आहे. उसाला एफआरपीपेक्षा जास्त दर देण्याच्या मागणीकरिता युवा शेतकरी संघर्ष समिती गावोगावी बैठका घेत आहे.

सध्या ऊस शेती प्रचंड खर्चिक बनत चालली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. उत्पादन खर्चात प्रचंड वाढ, मजुरीचा दर, खते व कीटकनाशकांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. पाणी टंचाईमुळे ऊस उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे उसाला अधिक हमीभावाची गरज आहे. यासाठी शेतकरी युवा संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन सुरू आहे. एफआरपीचा विचार करत ३,५०० रुपयांचा पहिला हप्ता जाहीर करावा, अशी आमची मागणी असल्याचे शेतकरी युवा संघर्ष समितीचे ज्ञानेश्वर उढाण यांनी सांगिले. उसाच्या उत्पादन खर्चात दरवर्षी मोठी वाढ होऊनही हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अस्वस्थ असल्याचे ते म्हणाले. याबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता ऊस उत्पादकांच्या नजरा कारखानदारांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here