जालना : समर्थ, सागर कारखान्याच्या गळीत हंगामाला प्रारंभ

जालना : राज्याच्या तुलनेत मराठवाड्यात ४० टक्के ऊस उत्पादन घेतले जाते. इथेनॉल, सीएनजी, सीबीजी, वीजनिर्मिती यामुळे साखर कारखाने ऊर्जा निर्मितीचे केंद्र बनत आहेत. आता शेतकरी ऊर्जा दाता बनला आहे, असे प्रतिपादन वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांनी केले आहे. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं. १ अंकुशनगरचा शुक्रवारी (ता.३१) सकाळी १० वाजता व युनिट नं. २ (सागर) तीर्थपुरीचा दुपारी ३ वाजता २०२५-२६ चे गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, माजी मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे महासंचालक संभाजी कडू-पाटील यांच्या उपस्थितीत गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात आली.

अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने अनुदान देण्यात येणार आहे. शासन नेहमीच शेतकरी कष्टकरी, कामगार यांच्या पाठीशी उभे आहे. बालविवाह व भृणहत्या रोखण्यासाठी शासकीय उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे व सहकार्य करावे. महिलांचा सन्मान करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी, संभाजी कडू-पाटील यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, कारखान्याचे सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोड वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते.

२० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : माजी मंत्री राजेश टोपे

यंदा कारखान्याने २० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पावसामुळे ऊस तोडण्यास अडचणी येत आहेत. शेतकरी बांधवांनी शेतातील मातीचे माती परीक्षण करून घ्यावे, ऊस पिकासाठी ठिबक सिंचन करावे, ऊस पिकासाठी कारखान्यामार्फत निर्मित गांडूळ खत, कंपोस्ट खत व पोटॅश खताचा ऊस पिकासाठी वापर करावा. ऊस रोपांद्वारे सुधारित जातींच्या उसाची लागवड करावी. ऊस पिकावर रोगप्रतिकारक औषधी, सूक्ष्म अन्नद्रव्य व विद्राव्य खतांची ड्रोनद्वारे फवारणी करावी. कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन योजनेत सहभागी व्हावे. कामगारांसाठी सर्व सोयी सुविधा दिल्या जातात, असे माजी मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here