जालना : जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये गोदावरी काठावरील शहागडसह बळेगाव, गंधारी, डोमलगाव, साष्टपिंपळगाव, वाळकेश्वर, सावळेश्वर, कुरण, पाथरवाला बु, पाथरवाला खुर्द येथे ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ढगाळ वातावरण, उष्ण हवामान व पावसाळ्यात जास्त प्रमाणात पावसाची उघडीप अशा प्रकारच्या अनुकूल परिस्थितीत पांढऱ्या माशीचे प्रजनन वाढते, असे कृषी सहायक अशोक सव्वाशे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
पांढरी माशी किडीचे नियंत्रण करताना पावसाळ्यात पावसाचा पंधरा दिवसांपेक्षा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे, रासायनिक खतांचा शिफारशीतच वापर करावा. उसाच्या शेंड्या जवळील पानावर पांढऱ्या माशाची अंडी आढळून येतात, ती नष्ट करावीत. कमी वयाच्या उसाच्या शेतात पांढऱ्या माशीच्या आकर्षणासाठी पिवळे चिकट सापळे लावावेत, असे कृषी सहायक विजय जाधव म्हणाले. क्रायसो परला कार्निया या जैविक भक्षक किडीचे १००० प्रौढ अथवा ५००० आळ्या सोडाव्यात तर जैविक कीटक नाशकामध्ये १. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
दरम्यान, कृषी विद्यापीठ शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. यामध्ये अॅसिफेट ७५ टक्के २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा डायमिथोएट २० मिली प्रति १० लिटर पाणी, इमिडाक्लोप्रिड १७.८ % ४ मिली व २ टक्के युरिया प्रति १० लिटर पाणी घेऊन फवारणी करावी, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे यांनी दिला.