करमाळा : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल सर्व २७२ उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत. मंगळवारी, दि. १८ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी झाली. यावेळी सहकारी संस्था व बिगर ऊस उत्पादक गटातील दोन अर्जांवर आक्षेप होता. कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, प्रा. रामदास झोळ, बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी बंडगर, माजी उपसभापती चिंतामणी जगताप, शंभूराजे जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, धुळाभाऊ कोकरे, चंद्रकांत सरडे, सुहास गलांडे, दशरथ कांबळे, रमेश कांबळे, संदीप मारकड, प्रशांत पाटील, देवानंद बागल अशा दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत.
दाखल अर्जापैकी माजी आमदार संजय शिंदे गटाचे सुजित बागल व शारदा मोरे यांच्या अर्जांवर डॉ. हरिदास केवारे यांनी आक्षेप घेतला. त्याची सुनावणी झाली. यामध्ये दोन्ही बाजूंच्या वकिलांनी म्हणणे सादर केले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले यांनी बागल व मोरे यांचे अर्ज मंजूर केले. दरम्यान, साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा पाच वर्षांपैकी तीन वर्षे गाळपासाठी ऊस गेलेला असावा, असा नियम आहे. मात्र कारखान्याचा गळीत हंगाम पाचपैकी दोनच वर्षे चालला. त्यामुळे निकष पूर्ण करण्यात अडचणी आल्याने ही अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे अडथळे दूर झाले आहेत.












