बेळगाव : खानापूर तालुक्यात मुबलक पाण्याची सोय असल्याने जळगे येथील नदी काठावरील शिवारात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेतले जाते. तोडणीसाठी टोळ्या न मिळाल्याने एकाही शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला गेलेला नाही. भागातील शेती पंपांना विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरजवळ वीज वाहिनीला शॉर्टसर्किट झाल्याने अचानक ठिणगी पडली. त्यातून सुकलेल्या उसाला आग लागली. काही क्षणातच आग सर्वत्र पसरली. जोरदार वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. काही वेळातच आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे ऊस पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. १५ शेतकऱ्यांचा जवळपास नऊशे टन ऊस जळून खाक झाला.
नदीकाठावरील शिवारात सोमवारी शॉर्टसर्किटमुळे ही भिषण आग लागली. या दुर्घटनेत मालोजी पाटील, सदानंद पाटील, व्यंकट पाटील, निंगाप्पा पाटील, नारायण पाटील, शामराव पाटील, चंद्रकांत पाटील, राजाराम पाटील, बाजीराव पाटील, महेश पाटील, विठ्ठल पाटील, बबन गुरव, महादेव गुरव, बाळू गुरव, परशराम गुरव, तुकाराम गुरव, शिवाजी गुरव, नारायण गुरव, परशराम लाड, सुनील लाड, भरमाणी लाड, नामदेव लाड, मारुती लाड, विठ्ठल लाड, नामदेव गुरव या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी वेळेत पोहोचू शकला नाही. परिणामी, आग आटोक्यात आणण्यास उशीर झाला. त्यामुळे सर्व ऊस जळाला. यामुळे हे शेतकरी संकटात सापडले आहेत.

















