बेळगाव : केंपवाडमधील विष्णुआण्णानगर अथणी शुगर्सच्या कार्यस्थळावर श्रीमंत पाटील फाउंडेशन, सांगलीतील सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल व नंदादीप डोळ्यांचे हॉस्पीटलतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. माजी मंत्री व अथणी शुगर्सचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत पाटील यांचा शनिवारी (दि. ३१) ७१ वा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त हे शिबिर होणार आहे. शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबिर चालेल. गेल्या २० वर्षांपासून कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या काळात शेकडो तरुण रक्तदान करतात. यंदाही या शिबिराला प्रतिसाद यंदा मिळेल, असा विश्वास फाउंडेशनला आहे.
शिबिरामध्ये हृदयाशी संबंधित ईसीजी, अॅन्जिओग्राफी, अॅन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी तसेच लहान मुलांच्या शस्त्रचिकित्सा, कान, नाक घसा यासह इन्टव्हेशनल रेडिओलॉजीद्वारे तसेच अन्य अत्याधुनिक यंत्रोपकरणाद्वारे ही तपासणी होणार आहे. डोळ्यांची तपासणी, गरजूंना चष्मा, अत्याधुनिक यंत्रोपकरणाद्वारे नेत्रपटल तपासणी, मोतीबिंदू तसेच संबंधीत अन्य आजारांची तपासणी होणार आहे. सामान्य तपासणीत रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबीन, खोकला, सर्दी, ताप याची तपासणी होऊन जागेवरच मोफत औषधे दिली जाणार आहेत. सवलतीच्या दरात रक्त व लघवी तपासणी, एमआरआय व सिटी स्कॅन करण्याचीही सोय या ठिकाणी केलेली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन फाउंडेशनने केले आहे.

















