बेळगाव : रायबाग तालुक्यातील कुडची येथील माजी आमदार शाम घाटगे यांच्या शेतात एकरी १८० टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. आधुनिक शेतीतून हे यश साध्य केले आहे. राजकारण, उद्योग, शिक्षण क्षेत्रासोबतच शेतीतही तितक्याच आत्मियतेने प्रयोग करणाऱ्या शाम घाटगे यांनी इस्त्रायलमधील आधुनिक रिंग पिट तंत्रज्ञान वापरून हा विक्रम केला आहे. यापूर्वीही त्यांनी एका एकरात ४० टन हिरवी मिरची व २८ टन सिमला मिरचीचे उत्पादन घेतले आहे.
इस्त्रायलमधील रिंग पिट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एका एकरात ६ फूट अंतरावर सुमारे १००० ते ११०० रिंग पिट तयार करण्यात येतात. प्रत्येक पिटमधून ७० ते १०० उसाची रोपे तयार होतात. प्रति ऊस ४ ते ६ किलो वजन मिळत असून, यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. शेतीचे व्यवस्थापक नईम पिनितोड यांनी प्रत्यक्ष शेतात ऊस तोडून वजन करून दाखवत ही माहिती दिली. या पिकासाठी १२ ते १४ महिन्यांचा कालावधी लागतो.
ठिबक सिंचनाद्वारे पाणी व खत दिले. सेंद्रिय खत, शेणखत व गोमूत्राचा वापर करण्यात आला आहे. एकरी सुमारे ४० हजार रुपयांचा खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. या विक्रमी उस पिकाची पाहणी करण्यासाठी माजी मंत्री रमेश जारकीहोळी, आमदार राजू कागे, शशिकांत पाटील यांच्यासह साखर कारखान्यांचे अधिकारी व अनेक शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापन आणि मेहनत घेतल्यास ऊस शेतीतूनही मोठे उत्पादन घेता येते, हे या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. माजी आमदारांची ही शेती पद्धत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

















