कर्नाटक : हिरण्यकेशी साखर कारखान्याच्या बगॅसला आग, मोठे आर्थिक नुकसान

बेळगाव : हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना अर्थात हिरा शुगरमध्ये बगॅसला आग लागल्याची घटना मंगळवारी, दि. २४ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत अंदाजे २५० टन बगॅस जळून खाक झाले. वेळीच उपाययोजना करण्यात आल्याने आग इतर साठ्याकडे पसरली नाही व मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या आगीत कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, कारखाना परिसरात बगॅस साठविण्यात आला आहे. काही कामगारा्ंना सकाळी अचानक त्यातून धूर निघत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने अग्निशमन यंत्रणेला कळविले. दरम्यान काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. कारखान्याच्या अग्निशमन पथकाने तसेच संकेश्वर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या फवाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. घटनास्थळी कारखान्याचे चेअरमन बसवराज कल्लटी, उपाध्यक्ष अशोक पट्टणशेट्टी, संचालक शिवनाईक नाईक, बसप्पा मरडी, प्रभुदेव पाटील, कार्यकारी संचालक महादेव स्वामी आदींसह सर्व संचालकांनी भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून, पुढील तपास करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here