चिक्कोडी : राज्यात पहिल्यांदाच बेळगाव जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन तीव्र झाले होते. शेतकऱ्यांची मागणी ३५०० रुपये ऊस दर देण्याची मागणी केली. मात्र, राज्य सरकारने मध्यस्थी करून यंदा ३२५० रुपये कारखान्यांकडून तर ५० रुपये सरकारकडून दर देण्याचा निर्णय जाहीर केला. दोन दिवसांपूर्वी सरकारने तोडगा काढून ऊस दर आंदोलन शांत केले आहे. त्यामुळे हंगामाला गती येईल, असे वाटत असताना अद्याप कारखान्यांकडून दराची घोषणा झालेली नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ बेडकिहाळ येथील व्यंकटेश्वरा कारखान्याकडून ३३५० रुपये दर जाहीर केला आहे. सरकारने जाहीर केलेल्यापेक्षा ५० रुपये हा अधिक दर घोषित केला आहे.
जिल्ह्यात ३० साखर कारखान्यांकडून यंदा गळीत हंगाम होणार आहे. सध्या हंगामासाठी तोडणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील, सीमाभागातील काही कारखान्यांनी किमान ३५०० रुपयांवर दराची घोषणा करून हंगामाला गती दिली आहे. त्याचा परिणाम बेळगाव जिल्ह्यातील कारखान्यांच्या गळितावर होण्याची शक्यता आहे. आंदोलन संपल्यानंतर सध्या कारखान्यांकडून ऊस तोडी सुरू झाल्या आहेत. मात्र काही कारखान्यांकडून उताऱ्यानुसार दराबाबत संभ्रमावस्था असल्याचे चित्र आहे. दरम्यान, विजापूर व बागलकोट जिल्ह्यात आंदोलन पुन्हा सुरू झाले असून ३३०० रुपये दराची मागणी करण्यात आली आहे. गेल्या हंगामात बेडकिहाळ कारखान्याने ३१०० रुपये दर दिला होता. यंदा २०० ते २५० रुपये अधिक दर मिळणार आहे. जिल्ह्यात सर्वच कारखान्यांना ३२५० व ५० रुपये असे सूत्र धरून ३३०० रुपये दर लागू केला असला तरी प्रत्यक्षात कारखान्यांकडून दर अधिक मिळण्याची शक्यता आहे.












