कर्नाटक : मार्कंडेय कारखान्याच्या सभेत कारखाना लीजवर देण्याबाबतचा निर्णय शक्य

बेळगाव : मार्कडेय सहकारी साखर कारखान्यावर २३० कोटींचे कर्ज आहे. साखर कारखाना सुरू केला जावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. परंतु, कारखाना सुरू करण्यासंबंधी अद्याप कोणत्याही हालचाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यापूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चालू वर्षांतील गळीत हंगाम साधणे आणि कारखाना लीजवर देण्यासंबंधी चर्चा करण्यात आली होती. काही संचालक हा साखर कारखाना लीजवर देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, अनेकांना हा निर्णय अमान्य असल्याने सध्या कारखान्याचे भविष्य टांगणीला लागले आहे. गुरुवारच्या (25 सप्टेंबर) सर्वसाधारण सभेत यावर महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो.

आज, गुरुवारी सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. संचालक मंडळातील काही सदस्यांनी कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा केली आहे. सरकारकडून साखर कारखान्याला आर्थिक मदत मिळावी, यासाठीदेखील प्रयत्न केला जात आहे. याबाबत, कारखान्याचे अध्यक्ष आर. आय. पाटील म्हणाले की, कारखान्यावर २०० कोटींहून अधिकचे कर्ज आहे. त्याची परतफेड करण्यासाठी कारखाना सुरू होणे आवश्यक आहे. कारखाना अल्प मुदतीसाठी भाडेतत्त्वावर घेण्यास कोणी तयार नाही. कारखाना सुरू करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्नदेखील करण्यात आले आहेत. कारखाना लीजवर द्यायचा असल्यास आधी सर्वांचे मत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या सर्व विषयांवर सर्वसाधारण सभेत चर्चा केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here