कर्नाटक : आर्थिक अरिष्टात अडकलेल्या हिरण्यकेशी कारखान्याच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू

बेळगाव : आर्थिक अरिष्टात अडकलेल्या संकेश्वर येथील हिरण्यकेशी सहकारी साखर (हिराशुगर) कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी हा कारखाना एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे गेला. नंतर तो दुसऱ्या गटाकडून तिसऱ्या गटाकडे गेला. आणि आता पुन्हा तो तिसऱ्या गटाकडून दुसऱ्या गटाकडे जाण्याची शक्यता आहे. हिरण्यकेशी कारखान्याचे तीस हजारांवर सभासद असून हजारो कामगार कारखान्यात काम करतात. राजकारणाच्या साठमारीत शेतकरी, कामगारांच्या भवितव्यासह कारखान्याचे उत्पादन आणि आर्थिक नियोजनावर परिणाम होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. यात राजकीय नेत्यांनी विधायक भूमिका घेण्याची गरज आहे.

यापूर्वी ‘हिराशुगर’च्या बहुसंख्य संचालकांनी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्याकडे कारखान्याला आर्थिक सहाय्य करून धुरा सांभाळण्याची विनंती केली होती. त्यानुसार जोल्ले, जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू होते. पण मधल्या काळात काही संचालकांमध्ये विस्कळीतपणा आला. ते अन्य गटाला जाऊन मिळाले. आता पुन्हा काही संचालकांनी जोल्ले, जारकीहोळी यांच्याकडे कारखान्याची धुरा सांभाळण्याचा आग्रह धरला आहे, तर काही संचालक अजूनही दुसऱ्या गटाच्या सत्तेची अशा बाळगून आहेत. हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना हा जुना तितकाच एकेकाळी आर्थिकदृष्ट्या स्थिरता मिळविलेला कारखाना आहे. कारखान्यात राजकारण येत असेल तर येथील शेतकरी, कामगारांच्या भवितव्यासह कारखाना विकासाचा प्रश्न बिकट होणार आहे. त्यामुळे येथे राजकारण विरहीत वाटचाल अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here