रायबाग : उसाला प्रती टन ३५०० रुपये दर मिळावा या मागणीसाठी निपाणी-मुधोळ महामार्गावर गुर्लापूरजवळ शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली राज्यातील साखर कारखान्यांकडून दर जाहीर होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. साखर कारखानदार, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी येथे येवून ऊस दर जाहीर करावा, यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारीसुद्धा आंदोलन करण्यात आले. निपाणी-मुधोळ मार्गावरील गुर्लापूरजवळ बेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्ह्यातील २५ हजारांहून अधिक शेतकरी आंदोलनात उतरले आहेत. आणखी शेतकरी आंदोलनात भाग घेतील, असे शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चन्नाप्पा पुजारी यांनी सांगितले.
रस्त्यावर उतरूनही लोकप्रतिनिधी फिरकत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. दर जाहीर होईपर्यंत येथून शेतकरी हलणार नाहीत अशी भूमिका घेण्यात आली आहे. आंदोलनस्थळी येऊन दराची घोषणा करा अशी त्यांची मागणी आहे. तेथेच जेवण करून शेतकरी जेवत आहेत. साऊंड सिस्टिम लावून तेथेच ठाण मांडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून चर्चेला निमंत्रण आले तरी मंत्री व कारखानदार जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत येथून हलणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांची संख्या वाढत चालल्याने जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त गुर्लापूरकडे वाढविण्यात आला आहे. या भागातील वाहतूक विस्कळीत झाली असून पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागत असल्याने वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.












