बेळगाव : यावर्षी गळीत हंगाम चालू करण्याअगोदर दर जाहीर करावेत, या मागणीसाठी कुडची पुलावर सुमारे तीन तासांहून अधिक काळ रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे रस्त्याचा दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यापूर्वी हारूगेरी येथील आंदोलनावेळी यावर्षीच्या दर जाहीर करेपर्यंत कारखाने सुरू करू नयेत, असा इशारा देण्यात आला होता. या भागातील सर्व साखर कारखान्यांना निवेदन देण्यात आले असून, यावर्षी कमीत कमी ३५०० दर जाहीर करावा तसेच गेल्या हंगामातील ३०० रुपये बाकी द्यावी. कारखानदारांनी दर जाहीर करेपर्यंत शेतकऱ्यांनी ऊसतोडणी करू नयेत. सर्व शेतकऱ्यांनी अधिक दरासाठी प्रयत्न करायचे असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चुनाप्पा पुजारी, मल्लाप्पा अंगडी, महेश सुभेदार, रमेश कलर, आतिफ पटाईट, अशपाक जलालखान, सादिक जिनाबडे, मुदसर जलालखान, इखलास सत्तार, बाबाजान जुन्नेदी, काशाप्पा जबंगी, बाबूराव पाटील, परसप्पा चनगुंडी, बाबूराव अंगडी, रमेश मंटूर आदी शेतकरी उपस्थित होते. आंदोलनात शेतकऱ्यांची संख्या अधिक होती. आपल्या मागणीसाठी कुडची पुलाजवळ आंदोलकांनी ठाण मांडून रास्ता रोको केल्याने मुख्य मार्गावर मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रशासन व पोलिसांकडून आंदोलन संपविण्यासाठी शेतकरी संघटनेशी चर्चा केली. तीन तासांनी हे आंदोलन आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी कुडची पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रीतम नाईक यांनी आपल्या सहकाऱ्या सह चोख बंदोबस्त ठेवला होता.