बेळगाव : जिल्ह्यात नोव्हेंबरपासून तोडणीला सुरुवात झाली असून, यावर्षी गळीत हंगाम लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. विविध भागांतील कारखान्यांकडून आपल्याच कारखान्याला अधिक प्रमाणात ऊस मिळावा, यासाठी प्रयत्नदेखील सुरू आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिवारात मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत आहे. सद्यस्थितीत कर्नाटकात ७६ कारखान्यांमधून १५.५० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. मात्र, महाराष्ट्र आणि उत्तर भारताच्या विविध भागांतून आलेले ऊसतोडणी कामगार शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीसाठी अधिक रकमेची मागणी करीत आहेत. ऊस तोडणी कामगारांना कारखान्यांकडून प्रत्येक टनाप्रमाणे त्यांचा दर ठरविण्यात येत असतो. तरीही विविध प्रकारची कारणे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करून रक्कम घेतली जात आहे. शेतकरीदेखील काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी ऊस तोडणी कामगार व उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला ठराविक रक्कम देत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
शेतकऱ्यांना नाहक आर्थिक विविध कारणे सांगून दिशाभूल केली जात आहे. याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसू लागला आहे. याबाबत हालगा येथील शेतकरी रणजित पाटील यांनी सांगितले की, ऊसतोडणी कामगार आणि ‘ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने शेतकऱ्यांकडे अधिक रकमेची मागणी करणे पूर्णपणे चुकीचे आहे. याबाबत सर्वच भागांतील कारखान्यानी संबंधितांना समज देणे अतिशय गरजेचे बनले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ याची दखल साखर कारखान्यांनी घेणे अतिशय गरजेचे बनले आहे. खुशाली आणि इंट्रीच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून होणारी लूट थांबवावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, देशात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांचा मिळून देशातील एकूण साखर उत्पादनात ९२ टक्क्यांहून अधिक वाटा आहे. त्यामुळे साखरेची किमान आधारभूत किंमत प्रति किलो ४१ रुपयांपर्यंत वाढवणे, इथेनॉल खरेदीच्या किमती वाढवणे आणि अतिरिक्त ५ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळविणे अशी मागणी केली जात आहे.

















