रायबाग : साखर कारखान्यांनी उसाला प्रति टन ४५०० रुपये दर द्यावा व गेल्या वर्षांची थकीत बिले तात्काळ द्यावीत, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले. हारुगेरी क्रॉसजवळ रयत संघाचे कर्नाटक राज्य अध्यक्ष चन्नाप्पा पुजारी, गौरवाध्यक्ष शशिकांत पडसलगी, राजू पोवार यांच्यासह जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते. त्यांनी सुमारे पाच तास आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. बसवेश्वर सर्कलवर ठिय्या मारून जिल्हाधिकारी व कारखान्यांचे प्रतिनिधी येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. प्रशासनाला माहिती देऊनही कारखानदार येत नसल्याने शेतकरी संतप्त झाले. यादरम्यान, आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे बेळगावहून आंदोलनस्थळी आले. यावेळी आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विविध मागण्या सादर केल्या. यावेळी चिक्कोडीचे प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांच्यासह रायबागचे तहसीलदार व पोलिस अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी सांगितले की, सरकारने यंदाच्या गळीत हंगामाची तारीख जाहीर केली आहे. पण, कारखान्यांनी अजून दर जाहीर केलेले नाहीत. यासाठी जिल्ह्यातील कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घ्यावी. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यास सांगण्यात येईल. चार दिवसांत ही बैठक घेऊ असे आश्वासन दिले. यावेळी शेतकऱ्यांनी एफआरपी, वजन काटे यासह इतर समस्या मांडल्या. शेतकऱ्यांसाठी वेळ देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले. वेळेपूर्वी कुठलाही कारखाना सुरू करू नयेत, यासाठी सूचना दिली जाईल. याचे उल्लंघन केल्यास कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी म्हणाले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक रामनगौडा बसर्गी यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासून येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.











