बंगळूर : राज्यातील पाच साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामात, २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांचे ३८ कोटी रुपये थकवले आहेत. भालकेश्वर शुगर्स, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, बसवेश्वर शुगर्स, नंदी सहकारी साखर कारखाना आणि जमखंडी शुगर्स या कारखान्यांचा यात समावेश आहे. तर ज्या कारखान्यांनी बिले थकवली आहेत, अशांपैकी काही कारखान्यांविरुद्ध ऊस विकास आयुक्त आणि साखर संचालकांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना ऊस बिल थकबाकी वसुलीबाबत वसुली प्रमाणपत्रे (आरआरसी) जारी केली आहेत. यामध्ये विजापूर जिल्ह्यातील कर्जोळ येथील श्री बसवेश्वर शुगर्स आणि बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी शुगर्स-हिरेपडसलगी, जमखंडी तालुक्यातील जमखंडी शुगर्स यांचा समावेश आहे.
ऊस बिले थकविणाऱ्या कारखान्यांमध्ये जमखंडी शुगर्सकडे सर्वाधिक १४.७४ कोटी रुपये आहेत. तर नंदी सहकारी साखर कारखान्याकडे ८.४९ कोटी रुपये थकीत आहेत. बसवेश्वर कारखान्याकडे ६.२३ कोटी रुपये, सोमेश्वर कारखान्याकडे ५.६३ कोटी रुपये आणि भालकेश्वर कारखान्याकडे ३.७३ कोटी रुपये येणे-बाकी आहे. दरम्यान, काही साखर कारखान्यांनी वसुली प्रमाणपत्राविरुद्ध उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्या आहेत. उच्च न्यायालयाने वसुली प्रमाणपत्रावर स्थगिती आदेश जारी केला आहे. सरकारने स्थगिती आदेश उठवण्याबाबत न्यायालयात आक्षेप सादर केले आहेत. उर्वरित तीन साखर कारखान्यांच्या ऊस बिलांची वसुली सुरू असल्याचे म्हटले आहे.