बेळगाव : हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यावर सध्या सुमारे ६०० कोटींचे कर्ज आहे. गतवर्षीचे थकीत ऊस बिल ६२ कोटी, कर्जाचे व्याज ४० कोटी व इतर डागडुजीसह कारखान्यावर मोठा भार आहे. यासंदर्भात मी, आमदार भालचंद्र जारकीहोळी व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने पुढील १० ते १५ वर्षांत कारखाना कर्जमुक्त करू. याकरिता सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केले. गुरुवारी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष बसवराज कल्लट्टी होते. वार्षिक सभेत व्यासपीठावर उपाध्यक्ष अशोक पट्टणशेट्टी, अप्पासाहेब शिरकोळी, राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी खासदार जोल्ले म्हणाले की, आगामी गळीत हंगामात दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. सहवीज प्रकल्प, इथेनॉल व स्पिरीट उत्पादन वाढवून कारखान्याचे उत्पन्नही उंचावले जाईल. शेतकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आपघात विमा, सवलतीतील साखर, मळीचे खत, सुधारित बियाणे व शून्य व्याजदरात कर्ज अशा सुविधा पुरवण्याचा संकल्प आहे. हुक्केरी तालुक्यातील सहकारी तत्त्वावरील अनेक संस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून सभासद व शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. व्यवस्थापकीय संचालक व्ही. एस. देसाई यांनी विषय वाचन केले. अध्यक्ष कल्लट्टी यांनी अहवाल वाचन केले. माजी संचालक डी. टी. पाटील, भीमगोंडा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मृत कामगारांच्या वारसांना धनादेश वाटप झाले. रमेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर, महानिंग हंजी यांनी आभार मानले.