बेळगाव : अंकली येथे शिवशक्ती व चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या कृषी विभागातर्फे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेल्या ऊस पिकाची पाहणी केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष, राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांनी केली. यावेळी त्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन केले. चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अण्णासाहेब पाटील, कृषी विभागाचे अधिकारी राहुल इचलकरंजे, डॉ. प्रभाकर कोरे को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे संचालक अशोक चौगुले, वसंत किलीकत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.
माजी खासदार कोरे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील शेतकरी प्रगती साधण्यासाठी पिकांसाठी पाण्याचा जास्त वापर करू लागला आहे. शेतकऱ्यांनी कमी पाणी व कमी खर्चात ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंबन करून एकरी शंभर टनांपेक्षा जास्त उसाचे उत्पादन घ्यावे. उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञानासह एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. नवनवीन तंत्रज्ञान व संशोधन होत आहे. शेतकरी मात्र आपल्या पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय करत आहेत. ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आपली पद्धती बदलण्याची गरज आहे.