बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील दत्त शेतकरी साखर कारखान्यातर्फे भोज येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा झाला. यावेळी दत्त उद्योग समुहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी डॉ. बी. ए. माने होते. गणपतराव पाटील म्हणाले की, चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून ऊस ओळखले जाते. त्यावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. निसर्गाची अवकृपा व शेतकऱ्यांचा या पिकाकडे बघण्याचा कल यामुळे पुरेसे उत्पन्न मिळत नाही. जादा उत्पन्न घेऊन आर्थिक विकास साधावयाचा असल्यास सेंद्रिय कर्ब वाढविण्यासह शेतीचे योग्य नियोजन महत्त्वाचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संकेश्वरच्या ॲग्री. रिसर्च सेंटरचे शास्त्रज्ञ सुनीलकुमार मुळे यांनी सांगितले की, डोन्नी, गंडसुळी यांसारख्या किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान होत आहे. पाणी, खतांचे योग्य नियोजन करून उसाची संख्या, वजन योग्य राखले पाहिजे. बियाणे वेळोवेळी बदलले पाहिजे. सरीत योग्य अंतर ठेवून सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहचण्याची व्यवस्था करावी. ८ ते ९ महिन्यांचे बियाणे वापरून दोन डोळा पद्धतीने लावण करावी. दत्त कारखान्याचे शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. लक्ष्मण हिंदलकर यांनी स्वागत केले. कारखान्याचे संचालक अप्पासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. दत्त कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, संचालक अरुण देसाई, इंद्रजित पाटील, शरद पाटील, डॉ. सुदर्शन मुराबट्टे आदी उपस्थित होते. राजू कुरुंदवाडे यांनी आभार मानले.