निपाणी : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या दूरदृष्टीतून शेतकरी, कामगार हिताचे निर्णय घेतले आहेत. अनेकांना त्यांचा हातभार लागला आहे. हालसिद्धनाथ कारखान्याने कामगार, सभासदांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी मानवतेच्या भावनेतून सामाजिक उपक्रम राबविले आहेत. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. तरीही अपघाताच्या घटना हातात नसतात. कुटुंबीयांना धीर देण्याचे कार्य कारखान्याने केले आहे, असे प्रतिपादन अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी यांनी केले. कारखान्याच्यावतीने बुदिहाळ येथे अपघातात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना विम्याचा धनादेश सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मृत कामगार संजय मुरलीधर जाधव यांच्या कुटुंबीयांना धनादेशाचे वितरण झाले.
आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या की, हालसिद्धनाथ कारखान्यासह सर्व संस्थेतील कर्मचाऱ्यांकडे आम्ही कुटुंबातील सदस्य म्हणून पाहतो. अनेक अडचणीतून काम करताना त्यांना सुविधा पुरविणे हे कर्तव्य आहे. यावेळी विरुपाक्षलिंग समाधीमठाचे प्राणलिंग स्वामी, सदलगा येथील गीताश्रम मठाचे श्रद्धानंद स्वामी, कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, संचालक अविनाश पाटील, प्रकाश शिंदे, समीता सासणे, जयवंत भाटले, किरण निकाडे आदींसह सभासद, शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.