बेळगाव : माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याकडून शेती उपयुक्त अवजारे, कीटकनाशक, रोपवाटिका, खते यासह विविध सुविधा दिल्या जात आहेत. बांधावर जाऊन ऊस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. त्या माध्यमातून ऊस उत्पादनवाढीसह शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे, असे प्रतिपादन ऊस विकास अधिकारी विश्वजित पाटील यांनी केले. कारखान्याकडून आयोजित कृषी प्रदर्शनात उसाच्या विविध वाणांसह सहभागी झालेल्या शेतकरी सभासदांना प्रमाणपत्र देऊन ते बोलत होते.
सभासद शेतकऱ्यांसाठी कृषिपूरक उपक्रम राबविले असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी नुकत्याच झालेल्या प्रदर्शनात असंख्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले. कारखान्याचे संचालक प्रकाश शिंदे, रमेश पाटील, किरण निकाडे, गणपती गाडीवड्डर, बाळगोंडा पाटील, आनंदा कुंभार व मान्यवरांच्या हस्ते मलगोंडा पाटील, इरगोंडा पाटील, राघु हेरवाडे, सदानंद कदम, विठ्ठल साठे या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप झाले. दादू कांबळे यांनी स्वागत केले. प्रवीण माने, बाळासाहेब वैराट, रघुनाथ देशमुख, शरद बन्ने, सोहन खोत, सचिन पाटील, अभिषेक कदम, सौरभ कोकणे, आर. जी. माने, शुभम पाटील, रवी निकाडे, सोहन शिंदे उपस्थित होते.