बेळगाव : जिल्ह्यातील काही कारखान्यांचा गळीत हंगाम संपुष्टात आला असून, ऊसतोड मजूर गावाकडे, मराठवाड्याकडे जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सर्व साखर कारखाने उद्दिष्ट गाठण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. दरवर्षी साधारणतः एप्रिलअखेर सर्व साखर कारखाने चालतात. परंतु, यंदा जानेवारीतच काही कारखाने बंद पडत आहेत. त्यामुळे वाहन व टोळीस दिलेल्या अॅडव्हान्समधील ७५ टक्के रक्कम शिल्लक राहिली आहे. याचा फटका कारखान्यांना बसू शकतो.
सध्या बागलकोट, बेळगाव, विजापूर जिल्ह्यातील काही कारखाने बंद झाले आहेत. तर अनेक कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे त्यामुळे ऊसतोड मजूर परतू लागले आहेत. चिकोडी जिल्ह्यातील कारखाने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी ऊस पाठविण्यासाठी गडबड करत आहेत. मजुरांची संख्या कमी असल्याने तोडणीत अडथळे आले आहेत.


















