बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून कित्तूर तालुक्यातील एमके हुबळी येथील मलप्रभा साखर कारखान्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी आरोप-प्रत्यारोप करत सताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे. राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्याचबरोबर कारभाराबाबत चौकशीचे आदेश बजावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून प्रभावती फकीरपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. १५ संचालकांची निवड करण्यासाठी २८ रोजी मतदान होईल. साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दि. १३ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यापूर्वी १२ रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. १३ ते २० या कालावधीत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दि. २१ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. दि. २२ पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहेत. दि. २८ रोजी कारखाना स्थळावर सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.