बेळगाव : बेळगाव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक प्रथमच हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यात आयोजित केली होती. या बैठकीला आमदार भालचंद्र जारकीहोळी उपस्थित होते. आ. भालचंद्र जारकीहोळी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब कुलगोड यांचा सत्कार हिरण्यकेशीच्या संचालक मंडळाने केला. हिरण्यकेशी साखर कारखान्याला आणि माजी खासदार जोल्ले यांना सर्व ते सहकार्य आम्ही करू, असे आश्वासन आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी दिले. हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याला त्यांनी यावेळी भेट दिली.
आमदार जारकीहोळी म्हणाले की, दिवंगत अप्पणगौडा पाटील यांनी या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा उद्धार व्हावा, या उद्देशाने हिरण्यकेशी साखर कारखान्यासह अनेक सहकारी संस्था स्थापना केल्या. आज या संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत. आता माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले हा कारखाना व्यवस्थित चालवतील यात शंका नाही. इतरही संस्थांचा कारभार पारदर्शक करतील. त्यांना सर्व सहकार्य करू. संचालक शिवनायक नाईक, बाबासाहेब आरबोळे, प्रभूदेव पाटील, बसवराज मरडी, सुरेंद्र दोडलिंगन्नावर, संगम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका विद्युत संघाचे अध्यक्ष जयगोंडा पाटील, माजी नगराध्यक्ष अमर नलवडे, संजय शिरकोळी, पवन पाटील, शंकर हेगडे, श्रीकांत हतनुरे, शशीराजे पाटील, सुरेश हुंचाळी, व्यवस्थापकीय संचालक विरनगौडा देसाई, सहायक व्यवस्थापक रवींद्र चौगला आदी उपस्थित होते.