कर्नाटक : सहकारी कारखान्यांत वजनकाटे चोख असल्याचा आमदार लक्ष्मण सवदी यांचा दावा

बेळगाव : खासगी कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या एकाच ट्रॅक्टरमधून किमान अडीच टन ऊस वजनात फरक करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे वजनकाटे आणि व्यवहारही चोख आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री, आमदार लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केले. कृष्णा सहकारी साखर कारखान्यांच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. काही वर्षांपूर्वी मी रायबाग, सिंदगी येथे साखर कारखाना सुरू करण्याचा परवानाही घेतला होता; परंतु हे साखर कारखाने सुरू केल्याने कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे नुकसान होईल, या एकमेव कारणासाठी कारखाने सुरू करण्याचा विचार सोडून दिला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार सवदी म्हणाले की, काही कारखाने चोख व्यवहाराने टिकून आहेत. शेतकऱ्यांनी सहकारी कारखान्यांना दर्जेदार ऊस पुरवला तर ते वाचविता येतील. आमदार राजू कागे यांनीही आपण आणि लक्ष्मण सवदी यांनी कृ्ष्णा कारखान्याच्या व्यवस्थापनात कधीही हस्तक्षेप केलेला नाही असे स्पष्ट केले. कारखान्याचे अध्यक्ष पराप्पा सवदी म्हणाले, कृष्णा कारखान्याला शेतकऱ्यांनी दर्जेदार ऊस पुरवून कारखाना मजबूत करावा असे आवाहन केले. व्यवस्थापकीय संचालक जी. एम. पाटील यांनी इतिवृत्तांत सांगितला. कार्यालयीन अधीक्षक सुरेश ठक्कनवर यांनी विषयांचे वाचन केले. मुख्य लेखापाल शंकर गोटखिंडी यांनी अंदाजपत्रक सादर केले. उपाध्यक्ष शंकर वाघमोडे. गुरुबसू तेवरमनी, शांतिनाथ नंदेश्वर, घोळेप्पा जत्ती, रुक्मिणी कुलकर्णी, रमेश पट्टण, सौरभ पाटील, सुनंदा नाईक, सिद्राय नाईक, मल्लिकार्जुन गोटखिंडी, हणमंत जगदेव, विश्वनाथ पाटील, पी. सी. पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here