कर्नाटक : बेळगाव जिल्ह्यात गळीत हंगामाची तयारी सुरू, ऊस दराबाबत संयुक्त बैठकीची प्रतीक्षा

बेळगाव : बेळगाव जिल्हा साखर उत्पादनात राज्यातील प्रमुख केंद्र असून येथील २४ हून अधिक साखर कारखान्यांवर लाखो शेतकरी तथा हजारो कामगार अवलंबून आहेत. यंदा एक नोव्हेंबरनंतर हंगामाला सुरुवात करण्याचा सरकारचा आदेश आहे. जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी त्यादृष्टीने तयारी करत बॉयलर अग्निप्रदीपन पूजन केले आहे. मात्र, अद्याप यंदाचा उसाचा तसेच तोडणी-वाहतुकीचा दर निश्चित झालेला नाही. ऊसपुरवठा केलेल्यांना १५ दिवसांत कारखान्यांनी बिले द्यावीत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जिल्हा प्रशासनाने अद्याप साखर कारखानदार, शेतकरी संघटनेचे नेते आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठक बोलावलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

दरवर्षी गाळप हंगाम सुरू होण्याआधी जिल्हा प्रशासन शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, साखर कारखान्याचे मालक अधिकारी आणि कारखान्यांना ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात येते. बैठकीत ऊसदर, ऊस गाळप करण्याचा कालावधी, वाहतूकदर आणि शिल्लक असणाऱ्या रकमेबाबत निर्णय घेण्यात येत असतो. यंदा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी केली आहे. मात्र मागील शिल्लक रकमेसह विविध मागण्यांबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. याबाबत कर्नाटक रयत संघाच्या हसिरू सेनेचे अध्यक्ष चिनाप्पा पुजारी म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने यंदाच्या वर्षातील पूर्वतयारी बैठक बोलावली नसून, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. एक नोव्हेंबरच्या आत ऊस गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांविरुद्ध आंदोलन हाती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here