उगार खुर्द : येथील उगार साखर कारखान्याचा २०२५-२६ वर्षाचा ऊस गळीत हंगाम सोमवारी (ता. १०) कारखान्याचे संचालक प्रफुल्ल शिरगावकर यांच्या उपस्थितीत कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक चंदन शिरगावकर यांच्या हस्ते सुरू झाला. या अगोदर संचालक सचिन शिरगावकर यांनी गव्हाणीची व उसाच्या मोळ्यांची पूजा केली. उगार कारखान्याचा हंगाम गतवर्षी १२५ दिवस चालला होता. या काळात १६ लाख २९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. हंगामात सुमारे २१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक चंदन शिरगावकर यांनी दिली.
शिरगावकर म्हणाले की, कारखान्याचा यंदाचा ८४ वा ऊस गळीत हंगाम आहे. उगार साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना ऊस दर दिला जाणार आहे. यंदाही शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला पाठवून द्यावा. कार्यक्रमास मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.












