बेळगाव : केंद्र शासनाच्या एफआरपी धोरणानुसार दर देण्यासाठी यंदाच्या गाळप हंगामात १२ लाख टन ऊस गाळप करण्याचे नियोजन शेती विभागाने ठेवले असून शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करावा असे आवाहन शिरगुप्पी शुगर वर्क्सचे कार्यकारी संचालक डॉ. रमेश दोडणावर यांनी केले. शिरगुप्पी शुगर वर्क्सच्या कार्यस्थळावर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष कल्लापण्णा मगेण्णावर, मुख्य व्यवस्थापक अरुण फरांडे, संचालक राज दोड्डण्णावर, शेती अधिकारी महावीर बिरनाळे, वीरेंद्र जाठर उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाने साखर, इथेनालचा दर अधिक केल्यास शेतकऱ्यांना अपेक्षित दर देणे सोयीस्कर होते, असे ते म्हणाले.
कारखान्याचे अध्यक्ष कल्लापाण्णा मगेण्णावर म्हणाले, गेल्या १२ वर्षांत प्रथम ऊसदराची कोंडी फोडून काटा, रिकव्हरी, चोख, पेमेंट रोख, पंधरा दिवसांच्या आत ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे ही परंपरा यंदाही कायम ठेवली जाणार आहे. चांगला दर देण्यात कमी पडणार नाही. यावेळी मुख्य व्यवस्थापक अरुण फरांडे यांनी मनोगत व्यक्त केले. साखर उद्योगाला ऊर्जितावस्था येण्यासाठी केंद्र शासनाने आपल्या धोरणात बदल करून साखर, इथेनॉलचे दर वाढवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.