बेळगाव : कर्नाटमध्ये ७.४५ लाख हेक्टर क्षेत्रात उसाचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यात ४.८० लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, यंदा काही भागात अति पाऊस तर काही भागात कमी पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय, उसाची मुळे कुडतरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. ढगाळ हवामानासह रासायनिक खतांचा जास्त वापर हेदेखील रोग वाढण्याचे एक कारण असल्याचे कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उसावर वाढलेल्या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कृषी खात्याने मोफत औषधपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत कृषी सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात पांढऱ्या किडीचा प्रादुर्भाव ऊस पिकांवर झाला आहे. यासाठी कृषी अधिकाऱ्यांचे एक पथक सज्ज केले आहे. या पथकाकडून ऊस पिकाची पाहणी केली जात आहे. किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जागृती करुन शेतकऱ्यांना मागदर्शन केले जात आहे. दरम्यान, सद्यस्थितीत ऊस बिलांची थकबाकी तसेच बियाणे, खतांच्या वाढत्या किंमती यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच अवैज्ञानिक शेती पद्धती व किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. बेळगाव जिल्हा ऊस उत्पादनात आघाडीवर आहे. विशेषतः घटप्रभा, कृष्णा नदीच्या काठावर उसाची लागवड अधिक प्रमाणात आहे. जिल्ह्यात साखर कारखान्याची संख्याही अधिक आहे. आता किडींच्या फैलावामुळे ऊस उत्पादनावरही परिणाम होईल अशी शक्यता आहे. उसाचे वजन वीस ते तीस टक्क्यांपर्यंत घटू शकते असा कृषी तज्ज्ञांचा अंदाज आहे.