बेळगाव : कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेने जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर प्रतिटन ५५०० रुपये दर द्यावा अशी मागणी केली आहे. यामध्ये कारखान्यांकडून ३५०० रुपये आणि सरकारकडून २००० रुपये दराची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी शुक्रवारी, दि. १० रोजी हारुगेरी क्रॉस येथे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रायबाग तालुक्यातील हजारोंच्या संख्येने शेतकरी हारुगेरी क्रॉस येथील या आंदोलनात उतरतील असे त्यांनी सांगितले.
प्रकाश नाईक यांनी सांगितले की, आतापर्यंत सरकार आणि साखर कारखान्यांच्या मालकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. उसाला उतारा मिळत नसल्याने गळीत हंगाम एक नोव्हेंबरपर्यंत गळीत हंगाम सुरू केला जाऊ नये, अशी मागणी आहे. सरकारने सर्वप्रथम कारखान्यांना उसाचा प्रतीटन दर जाहीर करण्यास सांगावे. ऊस दरप्रश्नी शेतकरी नेते आणि शेतकरी सुमारे ३० कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनादेखील सदर बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम एक नोव्हेंबरनंतर सुरू होणार आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.