कर्नाटक : राज्यात तब्बल ४,६८२ कोटी रुपयांची ऊस बिले थकीत, शेतकरी हवालदिल

बेळगाव : राज्यात ऊस गाळप हंगाम गतीने सुरू आहे. या गळीत हंगामात सहभागी झालेल्या सर्व साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३९० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३१.७२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. या उसापोटी साखर कारखान्यांनी १५ जानेवारीअखेर शेतकऱ्यांना १५ हजार ६०९ कोटी रुपये देणे अपेक्षित होते. मात्र, कारखान्यांनी अवघी १० हजार ९३५ कोटी रुपयांची बिले अदा केली आहेत. त्यामुळे राज्यात तब्बल ४,६८२ कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. याशिवाय, आता १ फेब्रुवारीपर्यंतची ऊस बिलेही थकीत आहेत. त्यामुळे त्यात आणखी वाढ झाल्याचे सांगण्यात येते. शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेत बिले जमा करण्याची मागणी होत आहे.

दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे कि, १५ जानेवारीअखेर बेळगाव जिल्ह्यातील कारखान्यांकडे १७६९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. बागलकोट जिल्ह्यात १३८२ कोटी रुपये, विजापूर जिल्ह्यात ६०८ कोटी रुपये, गुलबर्गा जिल्ह्यात ३८६ कोटी रुपये आणि बिदर जिल्ह्यातील कारखान्यांकडे २४९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. काही कारखान्यांनी ८० टक्के बिले जमा केली आहेत. तर काही कारखान्यांनी किमान बिले जमा केली आहेत. बागलकोट जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांकडून १५ डिसेंबरपर्यंतची बिले जमा करण्यात आली आहेत. याबाबत हंचिनाल येथील शेतकरी नेते इराप्पा म्हणाले की, साखर कारखान्यांनी नियमांनुसार १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले जमा करण्याचा नियम आहे. सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी. वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले जमा करावीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here