बेळगाव : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये यंदाही सर्वाधिक क्षेत्रावर उसाची लागवड होणार आहे. एकूण २ लाख ७२ हजार हेक्टरमध्ये ऊस पिक घेण्यात येणार आहे. ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून वेळेत पेरणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. अशी माहिती कृषी सहसंचालक शिवणगौडा पाटील यांनी दिली. सध्या सर्व पिकांच्या बियाण्यांचा मुबलक साठा असून तो वेळेत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याही पाटील यांनी सांगितले.
कृषी खात्यातर्फे दरवर्षी खरीप व रब्बी पिकांचे उद्दिष्ट जाहीर केले जाते. यासाठी आराखडा तयार केला जातो. त्या त्या हंगामाच्या आधी ही उद्दिष्टे जाहीर केली जातात. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामातील पिकांची उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. यात ऊस पिक प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ जोंधळा पिक आहे. जवळपास १ लाख ४१ हजार १५६ हेक्टरमध्ये हे पीक घेण्यात येणार आहे. सोयाबीन पिक तिसऱ्या क्रमांकावर असून ९९ हजार हेक्टर क्षेत्रावर त्याची लागवड होणार आहे. याशिवाय भात ६३ हजार हेक्टर, मूग ४० हजार हेक्टर, कापूस ३७,४०० हेक्टर, भुईमूग १९ हजार हेक्टर, तूर १५ हजार हेक्टर, उडीद ११ हजार हेक्टर व अन्य ३२, ४३० हेक्टर असे लागवड क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. या हंगामात पाऊस चांगला व वेळेवर झाला तर उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे असे पाटील यांनी सांगितले.