बेळगाव : ऊसदरासाठी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे. याची दखल विविध संस्था, संघटनाबरोबरच राज्यातील विरोधी पक्षातील भाजप नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे आंदोलनाला अधिक धार आली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून गुर्लापूर येथे ऊस दरासाठी आंदोलन हाती घेण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून दिवस रात्र धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस तोडणी हंगाम सुरू झाला असला, तरी आंदोलनामुळे तोडणी ठप्प झाली आहे.
सदलग्यात रास्ता रोको; तीन तास वाहतूक कोंडी…
ऊस दरासाठी महाराष्ट्र व कर्नाटकात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शासन व कारखानदारांचे लक्ष वेधण्यासाठी राज्य शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, करवे संघटनांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केले. तीन तास चाललेल्या या आंदोलनात शेतकरी व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. कर्नाटकातील साखर कारखान्यांनी प्रतिटन ३५००, तर महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून ३७५१ दर जाहीर करून त्यानंतरच गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी केली.
नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, माजी नगराध्यक्ष सुरेश उदगांवे, अभिजित पाटील, आनंद तारदाळे, अभय बदनीकाई, अभयकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनस्थळी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असून ऊस दर प्रश्न साखरमंत्री, साखर आयुक्त, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निदर्शनास आणून शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन दिले.
खते, बियाणे विक्रेत्यांचा पाठिंबा…
निपाणी, चिक्कोडी तालुका खते, कीटकनाशके व बियाणे विक्रेता संघटनेने बेडकिहाळ-शमनेवाडी सर्कल येथील आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. परिसरातील विक्रेत्यांनी बुधवारी (ता. ५) आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन निपाणी, चिक्कोडी तालुका खते, कीटकनाशके व बियाणे विक्रेता संघटनेचे धवल भिवरे यांनी केले आहे. सुमारे तीन तास वाहतुकीचे सर्व मार्ग बंद केल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला.
आंदोलनाला वकील संघटनेचा पाठिंबा…
यंदाच्या हंगामातील उसाला साडेतीन हजार रुपये प्रतिटन दर देण्याच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी ऊसतोड बंद आणि चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. संघटनेची मागणी मान्य न झाल्यास ऊसतोड बंद करून रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचे कर्नाटक राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी सांगितले. निपाणी येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात झालेल्या आंदोलनावेळी ते बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वकील संघटनेने पाठिंबा दिला. शेतकरी व वकील संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. एम. ए. सनदी, सचिव ॲड. नीलेश हत्ती, जे. ए. भोसले, एम. व्ही. कुलकर्णी, शिवानंद शिरगुप्पे, एस. एस. बन्ने, महेश दिवाण, ए. एम. डावळे, सुषमा बेंद्रे, सुनील पाटील, सुखदेव मगदूम, कलगोंडा कोटगे, सर्जेराव हेगडे, नितीन कानडे, सागर पाटील, सचिन कांबळे, आनंदा गायकवाड, बाबासाहेब पाटील, सुभाष खोत, सिद्धगोंडा मिरजे, विशाल मिरजे, एकनाथ सादळकर, प्रकाश नुले, बाबासाहेब पाटील, दयानंद पाटील, नामदेव साळुंखे यांच्यासह निपाणी व ग्रामीण भागातील संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गळतगा येथे जनजागृती सभा; तहसीलदारांना निवेदन…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी ३७५१ रुपये दर द्यावा, अशी मागणी करून त्यानुसार दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करू देणार नाही, असा इशारा संघटनेतर्फे दिला आहे.गुर्लापूर येथील ऊस आंदोलन तीव्र झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून येत्या काही दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हितासाठी संयम ठेवून ऊसतोड थांबवून संघटनेच्या आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन गळतगा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना, कर्नाटक राज्य रयत संघटना, विष्णू सेना, करवे व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. ४) जनजागृती सभेव्दारे केले. उपतहसीलदार मृत्युंजय डंगी, गळतगा गावकामगार तलाठी मल्लिकार्जुन हरिजन यांना निवेदन दिले.
शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी अथणी बंद यशस्वी…
शेतकऱ्यांच्या ऊस दरासह इतर मागण्यांच्या समर्थनार्थ मंगळवारी (ता. ४) अथणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला नागरिक, व्यापारी, डॉक्टर, विविध संघटना व शेतकरी संघटनेचा मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व दुकाने बंद ठेवल्याने आंदोलन शांततेत पार पडले. या आंदोलनात माजी आमदार शहाजान डोंगरगाव, माजी आमदार महेश कुमठळ्ळी, विविध संघटनांचे नेते, माजी सैनिक, डॉक्टर आणि शेकडो शेतकरी सहभागी झाले. आंदोलनादरम्यान “जय जवान जय किसान” या घोषणांनी परिसर दुमदुमला. अथणी शहरातील मुख्य चौकात आंदोलन सुरू असताना रुग्णवाहिका आल्यावर सर्व शेतकरी आंदोलकांनी रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर पुन्हा आंदोलन सुरू केले.
चिक्कोडीतही व्यापाऱ्यांकडून पाठिंबा…
चिक्कोडीत चक्काजाम करण्यात आला. तिसऱ्या दिवशी येथे व्यापाऱ्यांनी बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंजुनाथ परगौडर यांनी केले होते. त्यानुसार व्यापाऱ्यांनी बंद ठेवून ऊस दर आंदोलनाला पाठिंबा दिला. चिक्कोडीत दोन दिवस चक्काजाम केल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक कोलमडली होती. त्यामुळे मंगळवारी तिसऱ्या दिवशी रास्ता रोको न करता बंदचे आवाहन केले होते. शहरातील व्यापाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला. दुपारपर्यंत बसव सर्कल, सोमवार पेठ, गुरुवार पेठ, निपाणी-मुधोळ मार्गावरील दुकाने बंद होती. ऊस दरासाठी निरंतर आंदोलन सुरू असून चिक्कोडी तालुक्यातील विविध संघटनांकडूनही विविध गावांतही आंदोलन सुरू झाले आहे.
बेडकिहाळला ठिय्या : ऊस वाळत असल्याने नुकसान…
कर्नाटकातील विविध भागांत ऊस दरासाठी आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत संघटना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा उसाला ३७५० दर जाहीर केल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्यांना उसाची वाहतूक होऊ देणार नाही, असा निर्धार केला आहे. त्यामुळे बेडकिहाळ-शमनेवाडी सर्कलवर सलग चौथ्या दिवशी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर ठिय्या मारून बसले असून उसाची वाहने थांबूनच आहेत. शनिवारी रात्रीपासून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात ट्रॅक्टरमधून होत असलेली वाहतूक रोखली आहे. रविवार, सोमवारी शमनेवाडी सर्कलपासून सदलगा मार्गावर ७० ते ८० हून अधिक ऊस वाहतूक करत असलेले ट्रॅक्टर्स रोखले आहेत. सोमवारपासून बऱ्याच ट्रकांचीही भर पडली आहे. चार दिवसांपासून वाहतूक रोखल्याने उन्हामुळे ऊस वाळत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.












