बेळगाव : जिल्ह्यातील २९ साखर कारखान्यांपैकी कोणत्याही साखर कारखान्यात गळीत हंगाम सुरू करण्यात आला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. काही साखर कारखान्यांकडून गाळप हंगाम सुरू करण्यासाठी पूजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलन व पाऊस यामुळे गळीत हंगाम लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गळीत हंगाम सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली असली तरी ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याने प्रशासनाचा नाईलाज झाला आहे. ऊस वाहतुकीला पावसाचाही अडथळा निर्माण झाला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, जिल्ह्यामध्ये अद्याप कोणत्याही ठिकाणी ऊस गाळप सुरू नाही. एकही साखर कारखाना सुरू झालेला नाही. शेतकऱ्यांच्या मागणीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट घेऊन प्रशासनाची भूमिका मांडली आहे. तर, तीन हजार पाचशे रुपये भाव देण्यात यावा, अशी आग्रही मागणी करत शेतकरी संघटनांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको करून आंदोलन हाती घेतले आहे. आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे ऊस दर आंदोलन आणखी अधिक तीव्र झाले आहे.











