कर्नाटक : कागवाड तालुक्यातील तीन कारखान्यांकडून १८ लाख १५ हजार टन ऊस गाळप

बेळगाव : कागवाड तालुक्यातील यंदाच्या गळीत हंगामात कार्यरत तीन साखर कारखान्यांनी ३१ डिसेंबरअखेर १८ लाख १५ हजार ७४० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्यांनी ५३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तिन्ही साखर कारखान्यांच्या गळीत हंगामामुळे तालुक्यातील सर्व रस्त्यांवर उसाच्या बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रेलर, मालवाहू गाड्या दिसत आहेत. याशिवाय बस वाहतूक व अन्य वाहनांची वाहतूक सुरू असल्याने विविध रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली आहे. ऊस गळीत हंगाम सुरू झाल्याने जनावरांना वैरणीची सोय झाली आहे.

कागवाड तालुक्यात कडाक्याच्या थंडीतही ऊस तोडणी सुरू असून ऊस वाहतूक सुरू आहे. ऊसतोड व ऊस वाहतूक कामगार या कामात गुंतले आहेत. या भागात महाराष्ट्रातील अनेक ऊस तोडणी कामगार कागवाड तालुक्यात आले आहेत. दरवर्षीपेक्षा यंदा थंडीचे प्रमाण जास्त आहे. थंडीची पर्वा न करता ऊसतोड कामगार व ऊस वाहतूक कामगार कामात गुंतले आहेत. सद्यस्थितीत उगार साखर कारखान्याने सर्वाधिक ७ लाख ६२ हजार ५५० मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. केंपवाड येथील अथणी साखर कारखाना ६ लाख ३ हजार १९० मेट्रिक टन गाळप करून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कागवाड येथील शिरगुप्पी साखर कारखान्याने ४ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here