बेळगाव : उगार साखर कारखान्याच्या कृषी संशोधन व विकास विभागाने शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन कसे वाढवावे यासंबंधी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी कृषी विकास केंद्र बारामतीचे अधिकारी तुषार जाधव यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी उगार साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सोहन शिरगावकर होते. व्यासपीठावर ऊस तज्ज्ञ डॉ. संजीव माने होते. यावेळी ऊस पीक तज्ज्ञ संजीव माने यांनी शेतकऱ्यांना एकरी १०० टन ऊस उत्पादन कसे घ्यावे, याची माहिती दिली.
कृषी विकास केंद्राचे अधिकारी तुषार जाधव यांनी सांगितले की, उसाचे एकरी उत्पादन वाढावे, पाणी खते केव्हा व किती द्यावी, जमीन सुपीक कशी ठेवावी, याची वेळोवेळी माहिती होण्यासाठी ऊस बागायतदारांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करावा. ऊस पिकास गरजेपेक्षा जास्त पाणी व खत वापरू नये. ड्रिप पद्धतीने पाणी द्यावे, पाटाने पाणी देऊ नये. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबाबत आपण मार्गदर्शन करू. केन मॅनेजर ए. बी. व्हननावर यांनी स्वागत केले. आर. डी. मॅनेजर जगदीश पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. सर्कल सुप्रीटेंडेंट आर. डी. पाटील यांनी परिचय करून दिला. जनरल मॅनेजर (केन) ए. एस. सिद्धांती यांनी स्वागत केले. सीडीओ डी. ए. हेगडे यांनी आभार मानले.