काटामारी : उसाच्या वजन मापाच्या गंभीर तक्रारींची चौकशी करून अहवाल शासनास देणार – साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांचे शेतकरी संघटनांना आश्वासन

पुणे : उसाच्या वजनातील काटामारी आणि साखर उताऱ्यात होणारी चोरी रोखण्यात वजन मापे विभाग कमी पडत आहे. भरारी पथक शेतकरी प्रतिनिधींशिवाय कारखान्यांवर वजन काटे तपासणीस जातेच कसे? ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीला हाच विभाग जबाबदार असून, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी शेतकरी संघटनांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याकडे संयुक्त बैठकीत केली. त्यावर वजनमापाच्या गंभीर तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांवरील कारवाईचा अहवाल अन्न व नागरी पुरवठा सचिवांकडे पाठविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

पश्चिम महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत झाली बैठक…

शुक्रवारी साखर आयुक्त डॉ. कोलते यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधींसमवेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी विविध प्रश्न मांडून वजनमाप विभागावर निशाणा साधला. साखर कारखानास्तरावर वजन मापे विभागाकडून होणाऱ्या तपासणीतील त्रुटी मांडण्यात आल्या असून, त्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. उसाची वजन चोरी व साखर उतारा चोरीबाबतच्या तक्रारींची चौकशी केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेले भरारी पथक कार्यान्वित करून तपासण्या करण्याच्या सूचना प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिल्या आहेत, अशी माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली.

भरारी पथकात असणार आयटी तज्ज्ञ…

महसुली उत्पन्न विभागणी सूत्रांनुसार (आरएसएफ), हिशेब देणे बंधनकारक असतानाही कारखान्यांनी गतवर्षीचा अहवाल अद्याप दिलेला नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांकडून वारेमाप ऊसतोडणी वाहतूक खर्च कपात केली जात असल्याने ऊस वाहतूक अंतरानुसार ही रक्कम घेण्याचा आग्रह बैठकीत धरण्यात आला. अनेक कारखाने वजनात चोरी करतात. त्यासाठी भरारी पथकात आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ माणूस घेण्यावर सहमती झाल्याचे सांगण्यात आले.

बैठकीस साखर संचालक (प्रशासन) डॉ. केदारी जाधव, साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी, पुणे विभागाचे विशेष लेखापरीक्षक पांडुरंग मोहोळकर, सहसंचालक (विकास) महेश झेंडे, कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे, प्रादेशिक उपसंचालक गोपाळ मावळे, वजन मापक निरीक्षक दत्तात्रय पवार, मयूर साळुंखे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देवकर, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई, किसान मोर्चाचे भगवान काटे, सावकार मादनाईक, शरद जोशी संघटनेचे ज्ञानदेव पाटील, संभाजीराव चौगुले यांच्यासह संदीप राजोबा, मुकुंद पाटील, श्यामसुंदर जायगुडे, जनार्दन पाटील, सदाशिव कुलकर्णी, गब्बर पाटील, अभिजित कांजर, किरण साळोखे आदींसह शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते चर्चेमध्ये सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here